आजरा तालुक्यातील सिरसंगी गावचे सुपुत्र मारुती शंकर साटपे यांचे वेल्स कार्डिफ शहरात आहे ‘मारुती इंडियन रेस्टॉरंट अँड ग्रोसरी’
सिरसंगी : प्रतिनिधी

सातासमुद्रापार परदेशात राहूनही भारतीय संस्कृआणि सण-उत्सवांची परंपरा जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य साटपे कुटुंबीय गेल्या दोन दशकांपासून करत आहेत. वेल्समधील कार्डिफ शहरात असलेल्या त्यांच्या ‘मारुती इंडियन रेस्टॉरंट अँड ग्रोसरी’ या व्यवसायाच्या माध्यमातून ते परदेशातील भारतीयांची दिवाळी आनंदात साजरी होण्यासाठी विशेष योगदान देत आहेत.
आजरा तालुक्यातील सिरसंगी गावचे सुपुत्र मारुती शंकर साटपे आणि साधना शंकर साटपे या दाम्पत्याने आपल्या साहिल आणि माधव या दोन मुलांसह कार्डिफ शहरात गेल्या वीस वर्षांपासून हा व्यवसाय यशस्वीपणे उभा केला आहे. दिवाळीनिमित्त त्यांच्या दुकानात तयार फराळ, फराळाचे साहित्य, पणत्या, दिवे, फटाके यांसह दिवाळीसाठी लागणारे विविध साहित्य उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीयांना आपल्या मातृभूमीतील दिवाळीचा आनंद अनुभवता येत आहे.
केवळ दिवाळीच नव्हे, तर हिंदू धर्मातील विविध सण-उत्सवांसाठी लागणारे साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे हे दुकान कार्डिफमधील भारतीयांसाठी महत्त्वाचे केंद्र बनले आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील अस्सल खाद्यसंस्कृतीची चवही या रेस्टॉरंटमध्ये अनुभवायला मिळते. वांग्याचे भरीत, कांदाभजी, भाकरी, ठेचा तसेच कोल्हापुरी पद्धतीचा तांबडा-पांढरा रस्सा अशा पारंपरिक मराठमोळ्या पदार्थांमुळे हे ठिकाण महाराष्ट्रियन नागरिकांसह अनेक भारतीयांच्या पसंतीस उतरले आहे.

या व्यवसायाची ख्याती वाढल्याने अनेक नामवंत व्यक्ती, खेळाडू, उद्योजक आणि सेलिब्रिटी यांनीही या दुकानाला भेटी दिल्या आहेत. भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई, ज्येष्ठ क्रीडा समालोचक सुनंदन लेले आणि अभिनेते समीर चौघुले महाराष्ट्रातील अनेक आमदार व खासदार, खेळाडू यांनी येथे भेट देऊन साटपे कुटुंबीयांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
परदेशात राहूनही भारतीय सण-उत्सव, खाद्यसंस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवण्याचे काम साटपे कुटुंबीय करत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे सातासमुद्रापार राहणाऱ्या भारतीयांना आपल्या गावाची, मातीची आणि संस्कृतीची आठवण अनुभवता येत असून, साटपे कुटुंबीयांचे हे कार्य कौतुकास्पद ठरत आहे.














