
सिरसंगी गावच्या विकासासाठी योगदान; सामाजिक सलोखा जपण्यात आजही अग्रेसर
सिरसंगी : गावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेल्या चार दशकांहून अधिक काळ सक्रिय योगदान देणारे सिरसंगी गावचे माजी उपसरपंच अशोक लक्ष्मण चौगले हे एक स्पष्टवक्ते, रोखठोक स्वभावाचे आणि सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सिरसंगी परिसरात परिचित आहेत. गावातील कोणत्याही सहकारी संस्थेत कोणत्याही पदावर नसताना सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अशोक चौगले याना परीसरात अशोकआण्णा’ म्हणून ओळखले जातात.
1994 साली सिरसंगी गावामध्ये पहिले आध्यात्मिक पारायण सोहळा करण्यासाठी अशोक आण्णानी पुढाकार घेऊन प्रयत्न केले त्यावेळी कांही राजकीय व्यक्तिंचा विरोध असतानाही त्यांनी आर्थिक मदतीद्वारे पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवली, त्यानंतर कांही वर्षानंतर शिरसंगी, किणे कोळींद्रे वाटंगी हंदेवाडी या पंचक्रोशी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासाठी मंदिर उभारणीसाठी गायरान मधील जागा आपल्या उपसरपंच कार्यकाळात अशोक चौगले यांनी उपलब्ध करून दिली. २००४ मध्ये सिरसंगी बसस्थानक ते गोठणदेव वटवृक्षापर्यंतची पाणंद खुली करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. या मार्गालगतच्या शेतकऱ्यांशी सामोपचाराने चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवत पाणंद खुली करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच आज सिरसंगी मालिग्रे रस्ता पूर्णत्वास नेण्यास यश आले आहे .
गावातील सार्वजनिक सुविधांच्या विकासासाठीही त्यांनी प्रयत्न केले. गायरानातील स्मशानभूमीसाठी शेड उभारणे, हनुमान दूध संस्थेची इमारत उभी करणे आणि महादेव मंदिराच्या उभारणीसाठी पुढाकार घेणे अशा कामांत त्यांचे योगदान राहिले. तर विश्वकर्मा मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्यात अशोक अन्नाचा पुढाकार राहीला आहे , त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरीकांना बसण्यासाठी साई मंदिर समोर कठडा बांधण्यासाठी आग्रही भूमिका मांडून ते काम करून घेतले , २०१० ते २०१५ या कालावधीत ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला. तसेच कुंभार गल्ली ते तारओहळ या रस्त्याचे खडीकरण व रुंदीकरण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
तालुक्यातील दिवंगत राजाराम बापू, माजी सभापति मसणू सुतार यांच्यासह जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, आजारा साखर कारखाना चेअरमन मुकुंददादा देसाई, जिल्हा परिषद सदस्य सुधीरभाऊ देसाई, माजी सभापती विष्णुपंत केसरकर यांच्याशी अशोक आण्णांचे सलोख्याचे संबंध आहेत . विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी असलेल्या या संबंधांचा उपयोग त्यांनी सामाजिक कार्यासाठी केला.
स्पष्टवक्तेपणा आणि फटकळ स्वभावामुळे आपले मत थेट मांडणारे अशोक आण्णा हे दुसरीकडे गरजूंच्या मदतीसाठी तत्पर असतात. गावातील वादविवाद आणि तंटे सामोपचाराने सोडविण्यासाठी ते आजही पुढाकार घेतात. न्यायनिवाड्याच्या प्रक्रियेत सहभागी होत गावातील सामाजिक एकोपा आणि सलोखा टिकवून ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

बैलगाडी शर्यतींची आवड
अशोक आण्णा यांना लहानपणापासूनच बैलगाडी शर्यतींची विशेष आवड होती. १९९० ते २००५ या कालावधीत त्यांनी आजरा, गडहिंग्लज तसेच कर्नाटकातील विविध ठिकाणी झालेल्या बैलगाडी शर्यतींमध्ये सहभाग घेत सिरसंगी गावाचे नाव उज्ज्वल केले. त्यांच्याकडे असणाऱ्या बैलजोडीने पाच वर्षात तब्बल 71 वेळा स्पर्धेत भाग घेऊन पहिल्या तीन क्रमांक घेतल्याचे अशोक आण्णा सांगतात.

अशोक आण्णाच्या याच बैल जोडीने ७१ स्पर्धा जिंकल्या होत्या .













