सिरसंगी प्रतिनिधी
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत केंद्र शाळा सिरसंगी येथे महिला पालकांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला महिला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष संतोष कांबळे होते. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक शिवाजी बोलके यांच्या प्रास्ताविकाने झाली. यावेळी त्यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देतानाच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे महत्त्व, विद्यार्थ्यांना मिळणारा पोषणयुक्त आहार आणि पाककृती स्पर्धेचा उद्देश याबाबत मार्गदर्शन केले.महिला पालकांमध्ये पाककलेतील कौशल्याला प्रोत्साहन मिळावे, पौष्टिक व संतुलित आहाराबाबत जागरूकता निर्माण व्हावी तसेच विद्यार्थ्यांच्या आहारात विविध पौष्टिक पदार्थांचा समावेश व्हावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेदरम्यान महिला पालकांनी विविध प्रकारच्या आकर्षक, चविष्ट तसेच पौष्टिक पाककृती सादर केल्या. सहभागी महिलांनी आपल्या पाककलेचे कौशल्य आणि कल्पकता दाखवत स्पर्धेत रंगत आणली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. सुधा नागुरडेकर व सौ. सुप्रिया पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी विविध पाककृतींचे परीक्षण करून त्यांची चव, पौष्टिकता, सादरीकरण, स्वच्छता तसेच नाविन्यपूर्णता या निकषांच्या आधारे स्पर्धकांचे मूल्यांकन केले.स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. या उपक्रमामुळे महिला पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतराम केसरकर यांनी केले. यावेळी मारुती पाटील, उत्तम कोकितकर, शाळा समितीच्या उपाध्यक्षा प्रतीक्षा चौगले, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य संतोष चौगले संतोष सुतार , सुप्रिया कुंभार यांच्यासह शाळेतील शिक्षक, पालक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित मान्यवर, परीक्षक, महिला पालक व शाळेतील सर्व सहकाऱ्यांचे आभार सुप्रिया पाटील यांनी मानले. उत्स्फूर्त सहभागामुळे पाककृती स्पर्धा उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडली.















