महिनाभरानंतर हत्तीचे पुन्हा आगमन; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण, वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी
सिरसंगी प्रतिनिधी
सिरसंगी : महिनाभराच्या विश्रांतीनंतर हत्तीने पुन्हा सिरसंगी परिसरात प्रवेश केला असून, रविवारी रात्री वाटंगी जंगलातून सिरसंगी हद्दीत दाखल झालेल्या हत्तीने शेतातील उभ्या ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. नामदेव मयेकर, शंकर सावंत, चाळू सावंत आणि विजय साटपे यांच्या ऊस पिकांचे हत्तीने नुकसान केले, तर लक्ष्मण सावंत यांच्या शेतातील पाईप व पाण्याच्या टीचे नुकसान केले आहे.
मागील महिन्यात दोन दिवस सिरसंगी परिसरात धुमाकूळ घातलेल्या हत्तीला ग्रामस्थांनी एकत्र येऊन वाटंगी जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले होते. त्यानंतर महिनाभर शेतकऱ्यांनी शेतातील कामे उरकून घेतली होती. मात्र, आता पुन्हा हत्तीचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या परिसरात ऊस तोडणीचा हंगाम सुरू असून, शिवारात अनेक ठिकाणी ऊस पिके तोडणीच्या प्रतीक्षेत उभी आहेत. अशा परिस्थितीत हत्तीच्या वावरामुळे ऊस पिकांचे नुकसान होत असून, शेतकऱ्यांना डोळ्यांसमोर उभ्या पिकांची हानी पाहावी लागत आहे.
हत्तीच्या वारंवार होणाऱ्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत असून, वन विभागाने तातडीने लक्ष घालून हत्तीचा बंदोबस्त करावा तसेच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.















