सिरसंगी प्रतिनिधी
वाटंगी येथील १०७ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक कै. गणपतराव कृष्णा देसाई यांच्या बाराव्या दिवसाच्या कार्याचे औचित्य साधून देसाई कुटुंबीयांच्यावतीने विद्या मंदिर वाटंगी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कै. गणपतराव देसाई यांनी प्रदीर्घ आयुष्य जगत समाजाशी आपुलकीचे नाते जपले. त्यांच्या स्मृती जपताना धार्मिक विधींसोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी शाळेला शैक्षणिक साहित्य देण्याचा देसाई कुटुंबीयांचा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.
यावेळी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. दुःखाच्या प्रसंगीही समाजोपयोगी व शैक्षणिक कार्यातून आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृती जपण्याचा आदर्श देसाई कुटुंबीयांनी निर्माण केला.
यावेळी मुख्याध्यापक श्री. सुनिल कामत यांनी या उपक्रमाचे स्वागत करून वाटंगी येथे यानिमित्ताने चांगली परंपरा रुजू होत असल्याचे सांगितले . पंधरा दिवसांपूर्वी श्रीमती वंदना कृष्णा देसाई यांनी आपल्या पतीच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले होते. त्यामुळे ही प्रथा पुढे चालवून आदर्श निर्माण करावा असे मत व्यक्त केले . त्यांनी देसाई कुटुंबियांना धन्यवाद दिले . याप्रसंगी त्यांचे नातू धनंजय देसाई यांनी आनंददायी जगण्यासाठी जीवनात योगाभ्यासाची गरज असल्याचे सांगितले तसेच विद्यार्थ्यांकडून ध्यान एकाग्रता याचे प्रात्यक्षिक करवून घेतले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळाव्यवस्थापनचे अध्यक्ष श्री. उमेश घोरपडे होते तर सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष चौगले, रविंद्र देसाई, प्रविण देसाई शुभम देसाई, आणि किसनदेसाई अशी मान्यवर मंडळी उपस्थित होती. अनुजा केने यांनी सूत्रसंचलन केले तर अनिता कुंभार यांनी आभार व्यक्त केले.या उपक्रमाबद्दल विद्या मंदिर, वाटंगीचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने देसाई कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.














