किणे वार्ताहर
: कोळींद्रे (ता. आजरा) गावची ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा ११ व १२ मे २०२७ रोजी आयोजित करण्याचा निर्णय गावातील प्रमुख मंडळी, ग्रामस्थ आणि मुंबईकर ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यात्रेनिमित्त २४ एप्रिल ते १४ मे २०२७ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
गावामध्ये सुरुवातीपासूनच २०२६ ऐवजी २०२७ मध्ये यात्रा करण्याचा निर्णय माजी सरपंच शंकर उगाडे, सुरेश बुगडे, संभाजी सावंत, लक्ष्मण परीट, विष्णू वाके, रामचंद्र पाटील या प्रमुखांसह मुंबईकर ग्रामस्थ मंडळाच्या पुढाकारातून घेण्यात आला होता. त्यानुसार गावसभा घेऊन यात्रेचा निर्णय निश्चित करण्यात आला. यानंतर मुंबईकर ग्रामस्थ मंडळ व स्थानिक ग्रामस्थ यांच्यात बैठक घेऊन यात्रेच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
यात्रेच्या कार्यक्रमानुसार ४ मे रोजी इरडे पडणार असून, ४ ते १० मेदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ११ मे रोजी लक्ष्मी खेळविणे आणि मानकऱ्यांच्या हस्ते ओटी भरण्याचा धार्मिक विधी होणार आहे. १२ मे रोजी महालक्ष्मी देवीला गदगेवर बसविणे व बळ फिरविण्याचा कार्यक्रम होईल. तसेच सायंकाळी पाहुण्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
१३ मे रोजी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार असून, १४ मे रोजी लक्ष्मी भंडारण्याचा विधी आणि लक्ष्मीला पावून देण्याचा पारंपरिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमानंतर यात्रेची सांगता होईल, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
यात्रा उत्साहात व पारंपरिक पद्धतीने पार पाडण्यासाठी ग्रामस्थ आणि मुंबईकर ग्रामस्थ मंडळाकडून नियोजन करण्यात येत आहे.














