सिरसंगी प्रतिनिधी
आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मदन देसाई यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
मुख्याध्यापक श्री. मदन देसाई यांनी प्रतिमापूजन करून आपल्या मनोगतातून महात्मा गांधीजींच्या जीवनकार्यावर, सत्याग्रहावर आणि त्यांच्या विचारांच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. इयत्ता आठवीचा विद्यार्थी आदित्य अशोक कुंभार याने महात्मा गांधीजींची हुबेहूब वेशभूषा साकारून उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले. जयंतीच्या औचित्ताने संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देणारे फलक हातात धरत नागरिकांमध्ये जनजागृती केली . इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी गावात स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे पथनाट्य सादर केले. या पथनाट्याला सौ. मेघा चव्हाण मॅडम व कु. श्रुती वांजोळे मॅडम यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. बस स्टँडवर पार पडलेल्या या पथनाट्याला ग्रामस्थांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आणि गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनावेळी श्री. विठ्ठल चौगुले, श्री. आनंदा प्रभू, श्री. दिलीप देसाई, श्री. संतराम केसरकर, पोलीस पाटील दत्तात्रय गुरव, ग्रामपंचायत उपसरपंच पांडुरंग टकेकर, एकनाथ मातवणकर, अनिल परीट, गणू कसेकर, सुरेश येलगार, आणि पांडुरंग होडगे जयसिंग थोरवत यांच्यासह परिसरातील बहुसंख्य नागरिक, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















