बिबट्याचीही दहशत कायम; कुत्र्यांचे अवशेष आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
सिरसंगी, ता. आजरा : एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असतानाच, दुसरीकडे वन्यप्राण्यांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या चार दिवसांपासून हत्तीने सिरसंगी, वाटंगी आणि येमेकोंड परिसरात धुमाकूळ घालत ऊस व भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, वनविभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
सिरसंगी येथील भीमराव मयेकर, नामदेव मयेकर, नंदकुमार दळवी, संजय बुडके, संतराम पाटील आणि आनंदा टकेकर यांच्या ऊस व भात पिकांचे हत्तीने नुकसान केले आहे. तसेच विलास पताडे यांच्या खोपटाचेही नुकसान झाले आहे. आधीच शेतीतील खर्च वाढलेला असताना हत्तीच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

बिबट्याची दहशत कायम; कुत्र्यांचे अवशेष आढळले
दुसरीकडे परिसरात बिबट्याची दहशत अद्याप कायम आहे. विलास होडंगे यांच्या शेतातील आणखी एक कुत्रा गायब झाल्याने चिंतेत भर पडली आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी अमोल होडगे व विलास होडगे यांची गायब झालेल्या कुत्र्यांचे अवशेष जंगलात आढळून आले आहेत. या अवशेषांमध्ये केवळ डोके आणि दोन पाय आढळल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कुत्र्यांची शिकार बिबट्यानेच केली असावी, असा संशय शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

वनविभागाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी
हत्ती आणि बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तीमुळे होणारे शेतीचे नुकसान रोखण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात. व बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास शेती करणे कठीण होईल, अशी भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.















