सिरसंगी प्रतिनिधी :
आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस हत्तीने केली आहे . तर सिरसंगी परिसरातील शेतशिवारात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतातील कुत्रे गायब होणे आणि एका कुत्र्याचा मृतदेह अंगावर नखांचे ओरखडे असलेल्या अवस्थेत आढळल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सिरसंगी परिसरातील मिळालेल्या माहितीनुसार, ऐनाठी या शेतातल अमोल होडगे यांच्या जनावरांचा गोठा असून होडगे यांच्याकडे दोन कुत्रे होते. त्यापैकी एक कुत्रा मृतावस्थेत आढळला, तर दुसरा कुत्रा गायब झाला आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी विलास होडगे यांचे साखळीने बांधलेले कुत्रेही गायब झाले आहे. या घटनांमुळे परिसरात बिबट्याचा वावर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकाऱ्यांमधून भीतीचे वातावरण पसरले आहे . मागील आठवड्यात येमेकोंड येथील पोलिस पाटील मारुती कांबळे यानी त्यांच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगितले . यामुळे सिरसंगी येमेकोंड वाटंगी परिसरातिल शेतकऱ्यांमधून भीतीचे वातावरण आहे .
दुसरीकडे, सहा महिन्यानंतर हत्ती पुनः वाटंगी मोरेवडी परिसरात परतल्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंतेचे वातावरण आहे. गुरुवारी रात्री मोरेवडी येथील भैरू तुकाराम अडुळकर यांच्या शेतातील भात पिकाचे ऊस पिकाचे मोट्या प्रमाणात नुकसान केले आहे, सदर पिकाचा पंचनामा वनरक्षक तानजी कवळीकटीकर व वनशिपाई तानाजी खांडेकर यांनी केला , वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
वनविभागाने या घटनांची दखल घेऊन परिसरात पाहणी करावी, वन्यप्राण्यांच्या हालचालींचा मागोवा घ्यावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.
शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी एकट्याने शेतात जाणे टाळावे आणि वन्यप्राणी दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावण्याचा प्रयत्न न करता वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे















